top of page
Search

R to R trek experience in marathi

3 दिवस केलेल्या रायरेश्वर ते रायगड ट्रेकचा अनुभव शब्दात मांडायचा छोटासा प्रयत्न (तो लिहिता लिहिता छोटासा नाही राहिला)

3 रीत असताना राजा शिवछत्रपती हातात पडलं आणि माझ्या शिवकालीन इतिहासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि मग मी एकामागे एक 7 8 कादंबऱ्या वाचून काढल्या. त्यामुळे लागलेल्या आवडीला पुण्यात आल्यावर अजून खतपाणी मिळालं ते आसपासच्या किल्यांमुळे. मी तसे गाडीवरून जाऊन 40 पर्यंत किल्ले अनुभवले असतील पण त्यात कुठेतरी काहितरी राहून जातंय अस वाटायचं. अशी एखादी मावळ्यांसारखी मोहीम करावी अस सारख मनात यायचं. सागरदादांची R to R ची पोस्ट बघितली फेसबुक वर आणि ह्या मोहिमेबद्दल आकर्षण वाटू लागल. आजपर्यंत काहीना काही कारणाने बा रायगड सोबत जायचं राहिलेलं ते ह्या निमित्ताने पूर्ण झालं. आपलं शंभरी गाठलेल वजन आणि व्यायामाचा अभाव ह्याच्यामुळे करू शकू की नाही ही भीती मनात होतीच, पण म्हणलं बघूच आता..किती दिवस रडत बसणार..

रायरेश्वर बद्दल काय बोलावं. हिंदवी स्वराज्यस्थापनेची सुरुवातच इथून झाली. भल्या पहाटे उठून तिथल्या आरतीने मोहिमेची सुरुवात झाली आणि आम्ही ते पठार उतरू लागलो. पहिल्या 10 मिनिटातच सटकण्याचा श्रीगणेशा झाला आणि बऱ्याच दिवस सुस्त पडलेल्या त्या पृष्ठभागाला तिथून पुढे दिवसभर चांगला व्यायाम भेटला. सह्याद्री असा मजा बघतो कधी कधी, अगदी खूप दिवसांनी आलायसा माझ्याकडे, जर थट्टा करतो म्हणल्यासारखं. मध्ये छोट्या छोट्या वाडया भेटत होत्या. शहरी भागाचा कसलाही स्पर्श नसलेली ती माणसे शिवकालीन जगणं जगतायत् अजून. तिथल्या मुलांसाठी आम्ही वह्या घेऊन गेलेलो, उगाच फक्त स्वतःसाठी फिरण्यात काय अर्थ असा यामागील उद्देश. पुढे पठार उतरल्यावर बॅकअप टीमने करून ठेवलेले पोहे इतके चविष्ट झालेले, आहाहा! इथून दुर्गाडी कडे प्रयाण झाले. भोर वरून वरंध्याकडे जाताना मध्ये धरणाचा खालचा भाग मला फार आकर्षित करायचा. ह्या भटकंतीच्या निमित्ताने तिथून मार्गक्रमण करता आले आणि ती सुप्त इछ्या पूर्ण झाली. अगदी कुठंतरी लडाख मध्ये असल्या सारखा फील येतो तिथं मधली थंडगार पाण्याची नदी पार करताना. तेही 4 वेळा. खूप मस्त ठिकाण आहे हे. पुढे मोहनगडवर चढाईला सुरुवात झाली आणि सह्याद्रीने आपल्या खास ठेवणीतल्या पावसाचे फटकारे मारायला चालू केले. इथल्या पावसावर तुम्हाला प्रेमच करावं लागतं. त्याशिवाय तुम्ही सह्याद्रीचा आनंद घेऊच शकत नाही. हे रेनकोट वगरे सह्याद्रीच्या पावसात किस पेड की पत्ती. मध्ये काही विरगळी सापडल्या एक मंदिराजवळ आणि शिलेदारांनी गावकऱ्यांना त्यांच्याबद्दल माहिती देऊन त्या जपायची विनंतीवजा सूचना दिली. अगदी गोल फिरून फिरून वर चढणारी अशी विशिष्ट रचना आहे त्या किल्ल्याची. उंची भरपूर आहे आणि सह्याद्रीने धुक्यातून जे सौन्दर्य दाखवल ते अगदी अविस्मरणीय होत. स्वर्ग-स्वर्ग म्हणतात तो हाच वगैरे वाटत होतं तिथं. मधेच धुकं क्षणभरासाठी दूर झालं की कळायचं आपण किती वर आहे आणि आसपास काय आहे. हा सगळा मोर्यांच्या जावळीचा प्रदेश. इतिहासात म्हणलं गेलंय जावळीच्या जंगलात घुसायला काळीज लागत वाघाचंच. गर्द अशी ती पसरलेली वनराई याचीच साक्ष देत होती. कसे मावळे इकडे घुसले असतील आणि ती अजिंक्य जावळी जिंकली असेल..कल्पना करूनच थक्क व्हायला होतं! तिथून एका दुसऱ्या पायवाटेने खाली उतरलो आणि शिरगावात आमचा पहिला मुक्काम पडला. तुफान पावसात भिजत आल्यावर बॅकअप टीमने तयार ठेवलेला तो चहा आणि कार्पेदादांनी आपुलकीने केलेली विचारपूस थकवा घालवणारी होती. दिवसभर पायपीट करून रात्री गरमागरम भाकरीभाजी आणि वरणभात खायची मजा पंचतारांकित हॉटेलात नसते येत. जेवणानंतर ओळखी करून घ्यायच काम चालू झाल. काहीजण खूप अनुभवी, काही माझ्यासारखे असल्या range ट्रेक मध्ये नवखे आणि काही अगदी लातूर सारख्या शहरातून आलेले. पश्चिम महाराष्ट्र सोडून देखील लोक ह्या मोहिमेला येतायत एवढ्या लांबवरून ही खूप सुखद गोष्ट आहे..

पहाटे 4 लाच दुसरा दिवस चालू झाला. सकाळी सकाळी नीरा नदीच उगमस्थान पाहिलं. तिथून एक धबधबा चढून आम्ही रोड वर पोहोचलो. तिथून अगदी पळवतच बा रायगडच्या पोरांनी आम्हाला वरंध्यात पोहोचवलं. घाटाच्या वर वाघजाईच मंदिर आहे. तिथून खूप मस्त दृश्य दिसत. साला इथे एवढ्या वेळा येऊन पण आपल्याला ह्या वरच्या मंदिराबद्दल कस समजल नाही ह्याची लाज वाटली. गाडीवर येण्यात आणि पायी येण्यात हाच फरक असावा बहुधा. तिथून कावळ्यावर चढून पारच्या नाळेने किल्ला उतरायचा होता. ह्या नाळेची धास्ती घेऊन मी काही गेलो नाही आणि खाली परमाचीत वाट पाहत बसलेलो. इथेच पुढे शिवथरघळ आहे. भरपूर धबधबे आणि घळी असलेला संपन्न प्रदेश आहे हा. बरेच गाववाले पण सांगत होते नाळेतून येऊ नका वगैरे. पण आमचे सगळे मावळे सुखरूप परत आले याबद्दल टीमचं खरंच कौतुक आहे! नंतर मलाही वाटून गेलं जायला हवं होतं.. इथून बंधाऱ्यावरून, शेतावरून वगैरे जमेल तसं सेंदूर मलई मध्ये पोचायचं होत. तो प्रचंड असा मोरजोत धबधबा प्रत्येकवेळी डाव्या हातालाच होता. इथंच जवळ आमच्या ट्रेक मधल्या मामाचं आणि चिकनेंच गाव होत.. किती नशीबवान माणसं. वरंध, पडवी करत सेंदूर मलई जवळ पोचलो. तिथं मस्त एका नदीत तासभर डुंबलो. इथे 'चला बाहेर' च्या शिट्ट्या निष्प्रभ झालेल्या. कोणीही पाण्यातून बाहेर यायला तयार नाही. अगदी म्हशीसारखे. ट्रेकवर जाऊन अस नदीत डुंबता नाही आला तर चुकल्यासारखं वाटतं. सगळा शीण निघून जातो पण.. पुढे मुक्कामाच्या मठात पोचलो. दत्तांच मंदिर आहे तिथं. सर्वात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे ते कीर्तन. काय छान वाटत ते कानांना ऐकायला. मोहनदादांचं नाचणं बघून तर मला अगदी आपण आयुष्यात काय गमावलंय शहरात राहूंन हे सारख जाणवत होतं. घंटा तुमच्या रंगीबेरंगी झगझगत्या lights मध्ये त्याची मजा आहे. अगदी पन्नाशी पार केलेले मामा एखादया तरुणाला लाजवेल असे नाचत होते. त्या मंडळींना इतका आनंद झालेला एवढया तरुण पोरांना कीर्तनात एवढा उत्साह घेताना बघून की काय सांगू..ट्रेक म्हणजे फक्त चढणे उतरणे नाही, तर आसपासच्या लोकांचं जीवन पाहणं, जगणं, अनुभवणं हा त्यातला एक अविभाज्य भाग आहे. त्या दिवशीचं जेवण म्हणजे दुग्धशर्करा योग होता. भात, शेवग्याची आमटी, मिक्स भाजी, कोशिंबीर, शिरा आणि फणस. एवढ सुग्रास जेवण अपेक्षितच नव्हतं. जेवणानंतर सुद्धा पोरांचं टाळ आणि ढोलकीवर गाणी चालू झाली. भंडारा उधळण पण आलच सोबत. अगदी उधे ग अंबे उधे, नवरी नटली सारखी गाणी पण काय भारी वाटतात त्या तालावर. पाय फार दुखत होते म्हणून मी पडूनच त्या सगळ्याचा आस्वाद घेत होतो. पोरं अगदी घामानं अंघोळ करेपर्यंत नाचली. माझा कधीतरी डोळा लागला आणि सागरदादांचा bday celebration मिस झालं.

3 रा दिवस चालू झाला. रायगडाकडे प्रयाण..आता मात्र मांड्यांनी दगा द्यायला सुरुवात केली होती. (Actually मीच काहीही अरबट चरबट खाऊन त्यांना वाढायला प्रवृत्त केलेलं आधी) घासाघाशीचा आज तिसरा दिवस होता. त्या जखमा आता भळभळायला लागल्या होत्या. व्यायाम आणि खाण्यावर कंट्रोल नसणे यांचा पश्चाताप होण्याचा हा दिवस. सकाळी मस्त वातावरणात 13 kms च अंतर आम्ही अडीच तासात पूर्ण केलं. उजव्या बाजूला सूर्योदय होताना अर्धा धुक्याचा भाग मस्त पिवळा पडला होता आणि त्यातून दिसणारा ते गाढव टोक.. काय नजारा होता तो..वाह! मध्ये मध्ये येणारी छोटी घर, वाड्या, त्यांचं साठलेल्या पाण्यातील प्रतिबिंब..आणि मधून जाणारा तो खट्याळ डांबरी रस्ता. परत खास फोटोग्राफीला जाणारे मी तिकडे. हो, सांगायचं राहिलंच.. मी कॅमेरा घ्यायचं मुद्दाम टाळलेल. 3 दिवसात मी मोजून 30 फोटोस काढले असतील ते ही action कॅमेऱ्याने. मोबाइल 3 दिवस बॅगेतच. Switch ऑफ होता. काही वेळा फक्त निसर्ग एन्जॉय करण्यात जास्त मजा असते. माझ्यातल्या photographer ला 3 दिवस रामराम ठोकला होता. त्या रस्त्यावर मी कधीच दम सोडला असता पण पाठीमागच्या बा रायगडच्या त्या शिलेदाराने मला काही सोडू दिला नाही. तो नसता तर मी काही वाघोलीपर्यंत पोचलो नसतो. पुढे वाघोलीत मामांनी चहाची व्यवस्था केलेली आणि भाकऱ्या सुद्धा. चटणी भाकरी कांदा, सुख! मामा म्हणजे जाईल तिथं 10 नवीन घर जोडून येणारा अवलिया. प्रत्येकाला सोबत घेऊन जाणार, कोणी मागे पडला तर खास लक्ष देणारा आणि आपण आयुष्यात पैसे नाही पण माणसे फार कमावली हे अभिमानाने सांगणारा. आणि ते खरंच होत. फक्त स्वतः नाही, तर स्वतःसोबत 60 जणांची एका परक्या घरी चहाची व्यवस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करणे म्हणजे साधे नव्हे. आमच्या सारख्या friend request पाठवनाऱ्या आणि follow/subscribe करण्याऱ्या पिढीला ते शक्य नाही. इथून पुढे वाघोलीच्या खिंडीतून चढाई चालू झाली. वाघ दरवाजाचा सौंदर्य बघत आणि इतिहासाच्या गप्पागोष्टी करत 11 पर्यंत रायगडच्या पायथ्याला हिरकनीवाडीत आम्ही पोचलो. खालून कोणतेही किल्याचे अस्तित्व न दाखवणारा तो रायगड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथे मोहीम संपली. काही गोष्टी राहून गेल्या पण फिटनेस नसताना आणि पहिल्याच दिवशी 3 तासात फाटून हातात आल्यावर सुद्धा आपण इथपर्यंत आलो ह्याचा आनंद पण आहेच. पुढच्यावेळी सर्व पूर्ण करेलच. हे ही नसे थोडके!

ह्या मोहिमेत सह्याद्री खऱ्या अर्थाने जगता आला. अगदी ऊन, बेफाम वारा, तुफान पाऊस हे सगळं करत. आपले मावळे कसे जगले असतील आणि कसे स्वराज्य उभा केला असेल याचा प्रत्यय पावलापावलावर येत होता. खूप छान सदस्य होते सगळे.. सर्वांची नाव घेण इछा असून पण घेणं शक्य नाही.. पण रॉयल अनंत यादव (मामा), समीर, स्वप्नील, रोशन दादा, गोलांडे सर यांनी पहिल्यांदाच करत असलेल्या ह्या range ट्रेक मध्ये माझी विशेष काळजी घेतली. आशा ट्रेक मध्ये सह्याद्रीच्या कुशीत फार चांगले सहकारी मिळतात. जॉब मध्ये अथवा कॉलेजात 4-4 वर्ष राहून सुद्धा तसे लोक जिवलग बनत नाहीत हे सत्य आहे. म्हणून अशा मोहीमा मावळे होऊन जगायला शिकवतात. स्वतःलाच challenge करायला फार उपयोगी आहे हे. कोण कोठली वेगवेगळ्या ठिकानांवरून आलेली मंडळी.. पण वर्षानुवर्षीची सोबत असल्यासारखी 3 दिवस जगत होती. छत्रपतींनी सह्याद्रीला ओळखल होत. तो म्हणजे फक्त दगड धोंडे नाहीत. त्याच्या अंगाखांद्यावर खेळा, बागडा, तो स्वाभिमानाने जगायला शिकविल..महाराष्ट्रधर्म शिकवील.

आता थोडंस बा रायगड परिवाराबद्दल. स्वार्थाच्या पलीकडे गेलेला परिवार आहे हा. दाढ्या वाढवून, चंद्रकोर लावून आणि गुटखा थुंकत तलवारी घेउन फक्त राज्याभिषेकाला रायगडला जाणाऱ्या, उगाच जाळं आणि धूरचे हॅशटॅग फेकणार्या आणि social media वर 5000 टाळकी जमवून कधीही इतिहास न वाचलेल्या ओळी caption मध्ये फेकून शो ऑफ करणाऱ्या, सह्याद्री विकायला निघालेल्या (ट्रेक अँड ट्रॅव्हल ग्रुप्स) बेगडी शिवभक्तांमधले नाहीत हे. सगळा जमणारा पैसा स्वराज्यकार्यात खर्च होतो. आपल्या जाज्वल्य इतिहासाची तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करणारे मावळे आहेत हे. फक्त रायगडच नाही तर बाकी किल्ल्यांवर पण संवर्धनाची काम करतात ते. प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखून काम करत असतो. जास्तीत जास्त लोकांना ह्या दैदिप्यमान इतिहासाची सफर घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. आणि ह्या सगळ्या मावळ्यांना सांधून ठेवणारा दुआ म्हणजे सागर नलावडे (अर्थात शिलेदार) कसलाही माज नसणारा, मोहिमेसाठी अहोरात्र झिजनारा, प्रेमळ माणूस हा. ह्या सर्वांना आपण फार मोठठे कोणी नाही तर इतिहास जपणारे धुळीकण आहोत याची जाणीव आहे. पुन्हा संधी मिळाली की जाईलच.. असा होता ह्या 3 दिवसाचा संक्षिप्त (म्हणजे मोठा) लेखाजोगा!

22 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page